अबुजा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नायजेरियातील भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित कार्यक्रमात भारतीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केवळ अबुजा येथीलच नव्हे तर लागोससारख्या शहरांतूनही मोठ्या संख्येने भारतीय समुदाय आला होता.
वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या प्रगतीशील योजनांमुळे जागतिक स्तरावर देशाच्या वाढत्या भूमिकेवर राजनाथ सिंह यांनी भाष्य केले. नायजेरियातील भारतीय समुदायाच्या सकारात्मक योगदानाचे त्यांनी कौतुक केले. राजनाथ सिंह यांनी ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने ‘आत्मनिर्भरता’वर भारत सरकार भर देत असल्याचे सांगितले. दरम्यान, नायजेरियाचे राष्ट्रपती बोला टिनुबू यांच्या शपथविधी सोहळ्यालाही राजनाथ सिंह यांनी उपस्थिती दर्शवली.