नवी दिल्ली – उन्हाळ्यात घामोळ्यांवर वापरली जाणारी ‘नायसिल’ पावडर ही ‘औषधी पावडर’ नसून ‘सौंदर्यप्रसाधन’ असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. अप्रत्यक्ष कर कायदा आणि जीएसटी तरतुदींनुसार कॉस्मेटिक वस्तूंना अधिक कर आकारला जातो. त्यामुळे आता नायसिल पावडरच्या किमतीत वाढ होणार आहे. ही वाढीव किंमत ग्राहकांकडूनच वसूल केली जाणार आहे.
होमिओपॅथी केसाच्या तेलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनुकूल निर्णय दिल्यानंतर नायसिल पावडरबाबतही निकाल जाहीर केला. अश्विनी होमिओ अर्निका हेअर तेल हे सर्वसामान्य चाचणी आणि घटक चाचणी अशा दोन्ही चाचण्यांना अनुकूल असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले. औषध म्हणून वर्गीकृत केलेल्या उत्पादनासाठी आवश्यक बाब म्हणजे हे उत्पादन मूलत: उपचारात्मक किंवा रोगप्रतिबंधक वापरासाठी (औषध) आहे, की केवळ काळजी घेण्यासाठी (सौंदर्यप्रसाधन) आहे, हे नमूद करणे आवश्यक असते.
सर्वोच्च न्यायालयाने लागोपाठ अप्रत्यक्ष कर वर्गीकरणासंदर्भातील निर्णय देताना तेलाच्या बाजूने निकाल देऊन त्याला औषधाचा दर्जा दिला, तर घामोळ्यांवर उपचार करणार्या पावडरला कॉस्मेटिकचा दर्जा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्राहक सेवा क्षेत्राकडून आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे केपीएमजी-इंडियाचे हरप्रीत सिंग यांनी सांगितले.
’नायसिल’ पावडर औषध नसून सौंदर्यप्रसाधन! हायकोर्टाचा निर्णय
