मुंबई –
मुंबईत आपल्या प्रभागातील नालेसफाई पूर्ण न झाल्यास त्याची तक्रार महापालिकेच्या वेबसाईटवर करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. तक्रार करण्यासाठी वेबसाईट २५ मेपासून कार्यान्वित होईल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, वेबसाईट अजूनही बंद असल्याने तक्रार करायची कुठे, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
३१ मे रोजी नालेसफाईचे १०० टक्के काम पूर्ण करण्याचे धोरण होते. मात्र हे काम यंदा आठ दिवस आधीच पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने गुरुवारी केला. पालिकेने निश्चित केलेल्या ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळापैकी गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या १००.५१ टक्के गाळ काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. दरम्यान, उद्दिष्ट गाठले असले तरी त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले. गाळ काढला असला तरी नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले.