मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख यांच्या बरोबर कायम शिवसेनेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या पण कधीही प्रकाशझोतात न येणाऱ्या रश्मी ठाकरे आता पक्ष सावरण्यासाठी पुढे येत आहेत..
नाशकातील उद्धव ठाकरे शिवसेनेतील पडझड थांबवण्यासाठी आता रश्मी ठाकरेच मैदानात उतरल्या आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होण्याची शक्यता आहे. नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले की या बाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे.. एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात ही सभा होणार असल्याचे समजते..
दादा भुसे, आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते अजय बोरस्तेंसह १२ माजी नगरसेवक आणि संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी एकनाथ शिंदेंसोबत गेले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंव संजय राऊत अशा कोणत्याही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा दौरा असला की माजी नगरसेवक व महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात सामावून घेण्याचे धोरणच शिंदे गटाने आखले आहे. नाशिकची पडझड प्रमुख नेत्यांकडून थांबत नसल्यामुळे रश्मी ठाकरेच नाशिकच्या रिंगणात उतरणार आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांचा मेळावा घेऊन त्या शिंदे गटाला आव्हान देणार आहेत.
शिवसैनिकांमध्ये उत्साह
हा महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.