नाशिक
नाशिक येथे गेले अनेक दिवस मुक्कामाला असलेले ९८ उंट अखेरीस आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास राजस्थानच्या दिशेने रवाना झाले. ४ मे रोजी हे उंट नाशिक आणण्यात आले होते. हे उंट तस्करी करून आणण्यात आल्याची तक्रार प्राणिमित्रांनी केली होती. त्यानंतर उंट नाशिकमध्येच होते.
प्राणिमित्रांची तक्रार आल्यावर १११ उंटांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन उंटांच्या संगोपनाची जबाबदारी पांजरपोळ संस्थेला दिली होती. मात्र, हजारो किलोमीटर लांबवरून पायपीट करून आल्याने व वातावरणातील बदलामुळे अत्यावस्थ झाल्याने पैकी तब्बल १२ उंटांचा मृत्यू पांजरपोळ येथे झाला. त्यानंतर प्राणी मित्रांसह पांजरपोळ संस्थेने हे उंट राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. यानंतर राजस्थान येथील एका संस्थेने या उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. त्यानुसार राजस्थान येथून उंटांना सांभाळणारे सात रायका गुरुवारी पांजरपोळ येथे दाखल झाले होते.
अखेरीस आज शुक्रवार सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हे उंट पांजरपोळ येथून राजस्थानच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, एक उंट प्रवेशद्वारावरच जखमी झाल्याने त्याला पांजरपोळ येथेच ठेवण्यात आले. उर्वरित सर्व ९८ उंट हे राजस्थानकडे रवाना करण्यात आले. रोज वीस ते पंचवीस किलोमीटर प्रवास करुन तब्बल पंचवीस दिवसानंतर हे उंट राजस्थानला पोहोचणार आहेत.