गुवाहाटी –
भाजपमध्ये प्रवेश केला की भ्रष्टाचारी नेते ‘निरमा वॉशिंग पावडर’मध्ये कपडे धुतल्यासारखे स्वच्छ होतात, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. आता निरमाच्या जाहिरातीतील मुलीच्या चेहऱ्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार अर्जुन खोतकर या नेत्यांचे चेहरे लावलेली पोस्टर्स देशात झळकू लागली आहेत. आसामच्या गुवाहाटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त विरोधकांनी लावण्यात आलेली ही पोस्टर चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहेत. इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात स्वच्छ करणाऱ्या भाजपला विरोधकांनी या पोस्टरमधून चिमटा काढला आहे.
आसाममधील पारंपरिक ‘रोंगाली बिहू’ उत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी गुवाहाटीला आले होते. त्यांच्या मार्गावरच गुवाहाटीतील राजीव भवन भागात पोस्टर लावण्यात आले होते. त्या पोस्टरवर ‘निरमा गर्ल’च्या चेहऱ्याच्या जागी भाजपमध्ये गेलेले हिमंता बिस्वा सरमा, नारायण राणे, सुवेंदू अधिकारी, सुजना चौधरी, ईश्वरप्पा, ज्योतिरादित्य शिंदे, अर्जुन खोतकर यांचे चेहरे लावण्यात आले होते. असेच पोस्टर तेलंगणातील हैदराबादमध्ये लावण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाचे अध्यक्ष व तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांची चौकशी करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हैदराबाद दौऱ्यानिमित्त ही पोस्टर्स लावण्यात आली होती.