अहमदनगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी भरदुपारी निळवंडे धरणातून कालव्यात पाणी सोडण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, या प्रकल्पामुळे ३२ गावांतील पाणीपुरवठा योजनेला फायदा होणार आहे. आधीचे सरकार असताना प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु नंतर ही योजना बंद केली. आमचे सरकार आल्यानंतर तीसेक सिंचन प्रकल्पांना या सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे जवळपास सहा लाख आठ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. या भागातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील. सगळे हिरवेगार होईल, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केलेल्या शेतकर्यांना सहा हजार रुपये देण्याच्या योजनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, आतापर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याला भरावे लागत होते. पण आता ते पैसे आपले सरकार भरणार आहे. शेतकर्यांना फक्त १ रुपया द्यावा लागणार आहे. अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भातही एनडीआरएफचे निकष होते, तेही आम्ही बदलले. एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय आपण घेतला. २ हेक्टरची मर्यादा होती. ती आम्ही ३ हेक्टर केली. सततच्या होणाऱ्या पावसामुळे जे नुकसान होत होते. ते आता नैसर्गिक आपत्ती समजण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे.
निळवंडे धरण ५३ वर्षांनी पूर्ण
निळवंडे धरणाला १९७० मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु ते पूर्ण होण्यासाठी तब्बल ५३ वर्षांचा कालावधी लागला. आज या धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमधील १२५ गावांना पाणी उपलब्ध होणार आहे.