रांची:- २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याच्या हेतूने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मागील काही दिवसांपासून देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव बुधवारी झारखंडची राजधानी रांची येथे पोहोचले. देशातील राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी दोघांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली.
रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना झारखंड सरकारकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नितीश आणि तेजस्वी यांचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. सरकारच्या वतीने मंत्री मिथिलेश ठाकूर आणि मंत्री सत्यानंद भोक्ता यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे स्वागत केले.२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी नितीश कुमार हे पुढाकार घेत आहे. या आधीही त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह त्यांनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतल्या होत्या.
काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नीतीश कुमार यांनी भेट घेतली आहे. ठाकरे यांनी नितीश कुमारांना ‘मातोश्री’वर स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. त्यानंतर नितीश कुमार ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.