नीरज चोप्राची कमाल ‘भाला’ जगात अव्वल

बुडापेस्ट – भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. नीरजने दुसर्‍याच प्रयत्नात 88.17 मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले. ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा नीरज जगातील दुसराच भालाफेकपटू ठरला आहे. त्याच्या या सोनेरी यशाबद्दल देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल अ‍ॅथलेटिक्स सेंटरमध्ये भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. अंतिम फेरीत त्याची सुरुवात चांगली झाली नाही. त्याचा पहिलाच थ्रो फाऊल झाला. मात्र दुसर्‍याच प्रयत्नात जबरदस्त पुनरागमन केले. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. ही कामगिरी अंतिम फेरीतील कुठल्याही इतर खेळाडूला करता आली नाही. त्यामुळे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही तिसर्‍या प्रयत्नात 87.82 मीटर भालाफेक केली. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
भारताचे डी. पी. मनू आणि किशोर जेना हेदेखील अंतिम फेरीत पोहोचले आहे. मनूने तिसर्‍या प्रयत्नात 83.72 मीटरची भालाफेक केली. तर जेनाने दुसर्‍या थ्रोमध्ये 82.82 मीटरचा टप्पा गाठला. जेना पाचव्या, तर मनू सहाव्या क्रमांकावर राहिले. 1983 पासून आयोजित होणार्‍या या स्पर्धेत प्रथमच एखाद्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे, तर जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भारताचे हे एकूण तिसरे पदक आहे. गेल्या मोसमात युजीनमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते. तर महिलांच्या लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये पॅरिसमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
नीरजने सुवर्ण पदक जिंकताच देशभर आनंद साजरा करण्यात आला. हरियाणातील त्याच्या खांद्रा, पानिपत या गावात लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण गाव आनंदाने जागे होते. गावकरी आणि कुटुंबियांनी टाळ्या वाजवून आणि शिट्ट्या वाजवून ‘भारत माता की जय’ घोषणा दिल्या. वडील सतिश चोप्रा आणि नीरजचे काका भीम चोप्रा यांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या. निज्जूने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या. आपल्या देशासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. नीरज भारतात परत आल्यानंतर आम्ही आनंद साजरा करू, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राचे वडील सतिश कुमार यांनी दिली.
पंतप्रधानांसह मान्यवरांकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गोल्डन बॉय नीरजचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, प्रतिभावान नीरज हे उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. त्याचे समर्पण, अचूकता आणि उत्कंटता यामुळे तो केवळ अ‍ॅथलेटिक्समध्येच चॅम्पियन बनत नाही, तर संपूर्ण क्रीडा जगतातील अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या गोल्डन बॉयने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली. तुझ्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे आणि हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासात नेहमीच लक्षात ठेवला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top