हेग :
हेग शहरातील महत्त्वाचे महामार्ग रोखून धरत सरकारच्या हवामान विरोधी धोरणांविरोधात नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांमध्ये देशातील अनेक बड्या सेलिब्रिटींचा समावेश होता. यावेळी पोलिसांकडून आंदोलनाला विरोध करत १५०० हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली.
डच जीवाश्म इंधन सबसिडीच्या निषेधार्थ अनेक नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी वॉटर कॅननचा वापर केला. मात्र, आंदोलकांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. याउलट आंदोलक अधिक आक्रमक झले. पोलिसांनी एका आंदोलकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या हवामान विरोधी धोरणांविरोधात ‘एक्सटिंक्शन रिबेलियन’ नामक संघटना हे आंदोलन करत आहे. अलीकडेच, डच सरकारने म्हणजे नेदरलँडने जीवाश्म इंधन अनुदानाची घोषणा केली होती. त्याविरोधात आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या हवामान विरोधी धोरणांच्या विरोधात ७,०००हून अधिक लोकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने पोलिसांनाही त्यांना ताब्यात घेण्यासाठी हिंसक व्हावे लागले.