काठमांडू : नेपाळमधील अन्नपूर्णा शिखर सर करताना सोमवारी एक भारतीय गिर्यारोहक बेपत्ता झाला. तिसऱ्या छावणीतून तो बेपत्ता झाला असल्याची माहिती या मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्याने दिली. सेव्हन समिट ट्रेक्सचे अध्यक्ष मिंग्मा शेर्पा यांनी सांगितले की, राजस्थानच्या किशनगड येथील अनुराग मालू (३४) कॅम्प ३ वरून उतरताना ६ हजार मीटरवरून खाली पडल्यानंतर बेपत्ता झाला आहे.
मोहीम संघटनेचे अधिकारी शेर्पा यांनी सांगितले की, तिसऱ्या छावणीतून उतरत असताना मालू सुमारे ६ हजार मीटरवरून खाली पडून बेपत्ता झाला. तेव्हापासून गिर्यारोहकाचा शोध सुरू आहे. गिर्यारोहक अनुरागने पर्वत चढण्याचा प्रयत्न सोडला होता. तो कॅम्पवर परतत असताना दुपारी दरड कोसळली. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप काहीही माहिती नाही. बेपत्ता गिर्यारोहक मालूचा शोध सुरू आहे. त्याने पर्वत चढण्यासाठी प्रसिद्ध गिर्यारोहक बचेंद्री पाल यांचे मार्गदर्शनही घेतले होते.
मिंग्मा शेर्पा यांनी सांगितले की, राजस्थानमधील गिर्यारोहक अनुराग मालूने गेल्या वर्षी माऊंट अमा दाबलाम जिंकले होते. मालू यावेळी एव्हरेस्ट, अन्नपूर्णा आणि ल्होत्से चढाई करण्याचा विचार करत होता. राजस्थानच्या ३४ वर्षीय अनुराग मालूला कर्मवीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. गिर्यारोहणासाठी लडाखमधील प्रसिद्ध चादर ट्रेकसाठी २०२० मध्ये गिर्यारोहक गेले होते. मात्र अचानक नदीला पूर आल्यामुळे ते गिर्यारोहक अडकले होते. या घटनेबद्दल भारतीय वायू सेनेला माहिती मिळताच तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.