नोएडा
उत्तर प्रदेशातील नोएडामधील सेक्टर ३० मध्ये एका महिला वकिलाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला. रेणू सिंघल (६१) असे त्यांचे नाव असून त्या सर्वोच्च न्यायालयात वकील होत्या. रेणू यांचा पती सध्या फरार असल्याने त्यानेच त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा मुलगा मानव गौतम हा अमेरिकेत असतो.
या घटनेची माहिती मिळताच रेणू यांचे भाऊ आणि इतर कुटुंबीयांनी सेक्टर ३० पोलिसांना घटनास्थळी बोलावून घराचा दरवाजा उघडला. यावेळी त्यांना रेणू यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला. त्यांच्या कानातून रक्तस्राव झाला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तातडीने शवविच्छेदनासाठी पाठवला. नोएडा सेक्टर २० पोलीस ठाण्यातील पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरीश चंद्र यांच्यासह श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली होती.
डीसीपी नोएडा हरीश चंद्र यांनी याबाबत सांगितले की, सेक्टर ३० पोलिसांनी आम्हाला या घटनेची माहिती दिली. त्यांच्याकडे रेणू यांचे भाऊ तक्रार नोंदवण्यासाठी आले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याने बाकी सर्व बाबी शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होतील. आम्ही प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहोत. तक्रारदाराने रेणू यांची हत्या त्यांच्या पतीनेच केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या पतीचा फोन बंद असून तो फरार आहे.