नवी दिल्ली
ग्रेटर नोएडाच्या बिसरख कोतवाली परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या आम्रपाली ड्रीम व्हॅलीतील इमारतीची लिफ्ट कोसळून ४ कामगारांचा मृत्यू झाला. पाच कामगार जखमी झाले. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजता घडली. सर्व मृत कामगार बिहारमधील किशनपूरच्या टभका गावाचे रहिवासी होते.
लिफ्टमध्ये ९ कामगार बांधकामाचे साहित्य घेऊन येत अचानक लिफ्ट कोसळली. कामगारांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी चार कामगारांना मृत घोषित केले. पाच कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ग्रेटर नोएडाचे सीईओ एनजी रवी आणि जिल्हाधिकारी मनीष कुमार वर्मा यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
काही दिवसांपूर्वी ठाण्यातदेखील अशीच घटना घडली होती. बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळल्याने सात कामगारांचा मृत्यू झाला होता.