नौदलाकडून मध्यम पल्ल्याच्या
क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

विशाखापट्टनम – भारत आणि इस्राईल यांनी संयुक्तरित्या विकसित केलेल्या जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएम) नौदलाने आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौकेवरुन काल रात्रीच्या सुमारास चाचणी घेतली.या चाचणीचा नौदलाने व्हिडीओ ट्विट केला. या व्हिडीओत क्षेपणास्त्र हवेतील एका लक्ष्याचा भेद करताना दिसत आहे.
या क्षेपणास्त्राचे वजन 275 वजनाचे असून लांबी 4.5 मीटर आहे. व्यास 0.45 मीटर आहे. तसेच या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच वेळी हवेत 360 अंश फिरून अनेक लक्ष्यांवर किंवा शत्रूंवर हल्ला करू शकते. 70 किलोमीटर अंतरापर्यंत आणि 16 किलोमीटर उंचीपर्यंतचे कोणतेही लक्ष्य मग ते लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन भेदण्याची क्षमता क्षेपणास्त्रामध्ये आहे. ध्वनीच्या दुप्पट वेगाने संचार करण्याची क्षमता असल्याने या क्षेपणास्त्राचा मारा चुकवणे अवघड समजले जाते. नौदलामध्ये हे क्षेपणास्त्र 2016 मध्ये दाखल झाले असून विविध युद्धनौकांवर तैनात करण्यात आले आहे. काल रात्री केलेली चाचणी ही नियमित चाचण्यांचा एक भाग होती, शस्त्रसज्जता आणि क्षमता तपासण्याचा हा एक भाग होता.

Scroll to Top