तेल अवीव
इस्त्रायलच्या संसदेने न्यायालयीन सुधारणा कायदा मंजूर केला. सरकारने हे विधेयक यावर्षीं जानेवारीमध्ये आणले होते. तेव्हापासून या कायद्याला विरोध होत आहे. मात्र, आता या कायद्याला हिरवा कंदील मिळाला. हे विधेयक संसदेत ६४-० मतांनी मंजूर झाले. सत्ताधारी आघाडीच्या सर्व सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी मतदानादरम्यान सभात्याग केला होता. हा कायदा रोखण्यासाठी विरोधक सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
न्यायसंस्था दुरुस्ती बिल मंजूर झाल्यानंतर सोमवारी रात्री हजारो लोक जेरुसलेम आणि तेल अवीवच्या रस्त्यावर उतरले होते. सरकारच्या या निर्णयाविरोधात ३० हजारांहून अधिक इस्रायली डॉक्टरांनीही देशव्यापी संप पुकारला होता. इस्रायली मेडिकल असोसिएशनने २४ तासांचा संप पुकारला होता. डॉक्टरांव्यतिरिक्त राखीव सैनिकांनीही कर्तव्य बजावण्यास नकार दिला आहे.
दुसरीकडे, कायद्याच्या निषेधार्थ संपूर्ण इस्रायलमध्ये डॉक्टर संपावर गेले. इस्रायलचे आरोग्य मंत्री मोशे अर्बेल यांनी संपकरी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी इस्रायली हवाई दलाच्या २०० वैमानिकांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे.