वेलिंग्टन
एअर न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय विमानातून प्रवास करण्याआधी सर्व प्रवाशांचे विमानतळावर वजन करावे लागणार आहे. वैमानिकाला प्रवाशांचे योग्य वजन माहित व्हावे आणि विमान योग्यरित्या संतुलित करता यावे यासाठी २ जुलैपर्यंत १०,००० लोकांचे वजन तपासले जाईल, असे एअर न्यूझीलंडने सांगितले आहे.
‘आम्हाला कार्गो, विमानात तयार होणारे अन्न आणि हातात ठेवण्याच्या सामग्रीसह विमानात जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचे अचूक वजन हवे आहे. यामुळे प्रवासी, क्रू सदस्य आणि केबिन बॅगचे वजन निश्चित करण्यासाठी मदत मिळेल’, असे एअरलाइन्सच्या लाेड कंट्रोल इंम्प्रव्हमेंट स्पेशालिस्ट एलास्टेर जेम्स यांनी म्हटले.
सध्या बहुतांश एअरलाइन्स एव्हिएशन अथॉरिटीने ठरवलेल्या प्रवाशांचे सरासरी वजन ग्राह्य धरते. त्यानुसार, न्यूझीलंडमध्ये १३ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रवाशाला कॅरीबॅगसह वजन ८६ किलो ग्राह्य धरले आहे. २००४ मध्ये सरासरी प्रवासी वजन वाढवले. हे आधी ७७ किलो होते. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडचे लोक वजनदार असतात. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, न्यूझीलंडमध्ये प्रौढ लठ्ठपणा दर ३१ टक्के वरून वाढून ३४ टक्के झाला आहे. मुलांमध्ये लठ्ठपणा दर १० टक्क्यांवरून १३ टक्के झाला आहे. ‘प्रवाशांनी वजन काट्यावर जाताना घाबरू नये’, असेही जेम्स म्हणाले.