परळी:
बीड तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकरी कारखान्याच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी जीएसटी विभागाचा छापा पडला. गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु होती. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. सदर कारखान मागील तीन महिन्यांपासून बंद होता. तीन गाड्यांतून १० अधिकारी सकाळीच दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंसोबत जवळीक वाढत आहे. दोघे बहिण भाऊ आज एकाच व्यासपिठावर हजर होते. मात्र दुसरीकडे मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाकडून छापा टाकण्यात आल्या अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटीचा छापा पडल्यानंतर प्रतिक्रिया देताना पंकजा म्हणाल्या, ‘वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागील 6-7 वर्षांपासून नुकसानीत आहे. आम्ही तो कसातरी चालवत आहोत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची आम्ही काही दिवसांपूर्वी याच कारणाने भेट घेतली होती. यावेळी 4-5 कारखान्यांचा प्रश्न मांडला होता. आम्हाला जीएसटी भरायची आहे, लोन पेंडिंग आहे.असे प्रश्न होते. कारखान्याचे जवळपास दोनशे-अडीचशे कोटी लोन आहे. आम्ही सव्वादोनशे कोटी कर्ज फेडले आहे. या आजारी साखर कारखान्यांना मदत करा, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र आज अचानक जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. मी देखील अधिकाऱ्यांशी बोलले. पण अर्जंट कारवाई करण्याचे वरून आदेश होते, असे मला कळाले. तसेच त्यांच्याच वरील कार्यालयाकडून ही बातमी माध्यमांपर्यंत आधी पोहोचल्याचेही मला कळले हे अत्यंत दुर्दैवी आहे.’