पंतप्रधानांनी आमचीही ’मन की बात’ ऐकावी आंदोलनकर्त्या पहिलवानांची मोदींना विनंती

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ आम्ही नेहमीच ऐकतो. पण त्यांनी आमचीही ‘मन की बात’ ऐकावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिला पहिलवान विनेश फोगट यांनी केली आहे. तसेच ब्रजभूषण यांच्यावर एफआयआर दाखल झाला असला तरी ते उघडपणे फिरत आहेत. त्यामुळे त्यांना जोवर अटक होत नाही तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असेही विनेशने सांगितले.
ब्रजभूषण यांच्या विरोधात जंतरमंतरवर पहिलवानांचे धरणे आंदोलन सुरू आहे. त्याला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. आज या आंदोलनाचा 8 वा दिवस आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी त्यांचे पती रॉबर्ट वड्रा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील काही मान्यवर खेळाडूंनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनेश फोगट हिने सांगितले की, आमच्या या आंदोलनाला देशाच्या विविध क्षेत्रातील करोडो लोकांचा पाठिंबा मिळत आहे. हीच आमची ताकद आहे. बजरंग पुनियाने सांगितले की आमची लढाई निवडणुकीसाठी नाही तर आमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आहे. ब्रजभूषण गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक शोषणासारख्या गुन्ह्याअंतर्गत एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे जोवर त्याला अटक होत नाही तोवर आमचे आंदोलन थांबणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top