मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाबाबत वाद सुरू असतानाच ते गुजरात विद्यापीठातून फर्स्ट क्लास घेत एमए उत्तीर्ण झाल्याचे सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या सर्टिफिकेटच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत खुलासा आलेला नसताना विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवित गोंधळ घातला.
शैक्षणिक पदवीवरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. गुजरात विद्यापीठाच्या या एमए सर्टिफिकेटवर एन्टायर पॉलिटिकल सायन्स असा विषय लिहिला आहे. याबाबत तर आक्षेप घेण्यात आला आहे, पण इतर तपशिलाबाबतही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘आप’ने या विषयावर भडीमार सुरू ठेवलेला असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी यांच्या डिग्रीवर खोचक ट्विट केले आहे. ‘एन्टायर पॉलिटिक्स’ या शोधपर विषयावरील पंतप्रधानांची पदवी ‘ऐतिहासिक आणि क्रांतीकारक’ आहे असे म्हणत ती फ्रेम करून नव्या संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवायला हवी, जेणेकरून लोक पंतप्रधानांच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित करणार नाहीत, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी लिहिले आहे की, आमच्या पंतप्रधान मोदींची ही डिग्री बोगस आहे असे लोक म्हणतात. मात्र, मला वाटते की, ‘एन्टायर पॉलिटिकल सायन्स’ या संशोधन विषयावरील ही ऐतिहासिक व क्रांतिकारी डिग्री आहे. ही डिग्री नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लावायला हवी. जेणेकरून लोक पंतप्रधान मोदींच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित करणार नाहीत. पंतप्रधानांच्या डिग्रीसंबंधीची माहिती उपलब्ध करून द्या, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे सात वर्षांपूर्वी केली होती. आयोगानेही ही माहिती देण्याचा आदेश दिला होता, पण तो आदेश शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयाने रद्द केला आणि केजरीवालांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी रविवारीदेखील पत्रकार परिषदेत पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधानांनी देशासमोर सत्य आणावे, अशी मागणी केली होती. त्यांची पदवी फसवी असली, तर त्यांना लोकसभा सदस्यत्व सोडावे लागेल. निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिल्याबद्दल ते अपात्रही ठरू शकतील, अशी शक्यताही सिंह यांनी वर्तवली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मात्र मोदींच्या शिक्षणाचा विषय अजिबात महत्वाचा नाही, असे आज स्पष्ट केले. ते म्हणाले की, मोदींनी 2014 ला देशभर करिश्मा निर्माण केला. त्याचे श्रेय त्यांनाच आहे. त्यामुळे त्यांच्या डिग्रीवर जाऊ नये. राजकारणात शिक्षण हा मुद्दा नसतो. महत्त्वाचा मुद्दा आहे तो महागाई आणि बेरोजगारीचा.
व्हायरल डिग्री बनावट?
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पंतप्रधान मोदींच्या एम.ए डिग्री सर्टिफिकेटवरील युनिव्हर्सिटीचे स्पेलिंग चुकीचे आहे. मोदींच्या वडिलांच्या नावाचे स्पेलिंगही चुकलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे पॉलिटिकल सायन्स या शब्दाआधी एन्टायर शब्द वापरण्यात आला आहे. सर्टिफिकेटवर विषय नसतो आणि एन्टायर हा शब्द नसतोच. या सर्टिफिकेटवर वापरण्यात आलेला एमएस फॉन्ट 1992 मध्ये अस्तित्वात आला, मात्र मोदींची पदवी 1983 मधील आहे, असा दावाही अनेकांनी सोशल मिडियावर केला आहे.
पंतप्रधान मोदी एमए फर्स्ट क्लास उत्तीर्ण