मुंबई : समृद्धी महामार्गावरचा टोलनाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. ट्विट करत भाजपने टोलनाके फोडण्याआधी बांधायला शिका आणि शिकवा, असा सल्ला दिल्यानंतर ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले ते टोल बांधण्याबद्दल आम्हाला काय शिकवणार, असे मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले.
समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ‘भाजप महाराष्ट्र’ या ट्विटर अकाऊंटवरून भाजपने मनसे कार्यकर्त्यांच्या टोलफोडीचा व्हिडिओ शेअर केला. यात कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अमित ठाकरे, टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा’, असा सल्ला दिला आहे. या नंतर संदीप देशपांडे यांनी ट्विटमधूनच भाजपला उत्तर दिले आहे. ‘मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का’, शिवाय ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले ते टोल बांधण्याबद्दल आम्हाला काय शिकवणार. त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा आधी स्वत: चा पक्ष बांधावा, अशी प्रतिक्रिया दिली.