पणजी – प्लॅस्टिकचा वापर कायमचा बंद व्हावा यासाठी पणजी पालिकेने नवीन शक्कल लढवली असून आता पणजी बाजारात कापडी पिशव्या भाड्याने मिळणार आहेत. ग्राहकांना भाड्यापोटी २० रुपये शुल्क द्यावे लागेल अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली. पणजी बाजारात ‘आमची पोती’ या उपक्रमास प्रारंभ झाला.
यावेळी कलाकार सागर नाईक मुळ्ये, उपमहापौर संजीव नाईक, नगरसेवक प्रमय माईणकर, जीआयझेड संस्थेचे फरदिन सिल्व्हेस्टर, आदित्य कुमार आदी उपस्थित होते.महापौर मोन्सेरात यांनी सांगितले की,या उपक्रमासाठी पणजी बाजारात एक स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला आहे. ग्राहक २० रुपये देऊन कापडी पिशवी भाड्याने घेऊ शकतात.पुढच्या वेळेस बाजारात पुन्हा येताना ही पिशवी पुन्हा देऊन २० रुपये अनामत रक्कम परत घेऊ शकतात.काही कारणास्तव पिशवी खराब झाली किंवा फाटली असेल तरी देखील ती परत केल्यावर पूर्ण अनामत रक्कम मिळणार आहे.जुनी पिशवी देऊन नवी घेण्याची सोय देखील उपलब्ध आहे.