पती सिक्कीमचे मुख्यंमत्री होताच पत्नीचा आमदारकीचा राजीनामा

गंगटोक- सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी तमांग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर एका दिवसाने कृष्णा कुमारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. कृष्णा कुमारी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंटचे उमेदवार बिमल राय यांचा नामची सिंघीथांग मतदारसंघातून पराभव केला होता. कृष्णा कुमारी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत होत्या. तमांग यांच्या सिक्किम क्रांतिकारी मोर्चाने विधानसभा निवडणुकीत ३२ पैकी ३१ जागा जिंकल्या होत्या.
कृष्णा कुमारी यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या मतदारसंघातील नागरिकांना पत्र लिहिले. “मी पक्षाच्या निर्णयाचा सन्मान करून निवडणूक लढवली होती. मोठ्या दुःखी मनाने मी सांगत आहे की मी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मी कधीही विचार केला नव्हता की, मी इतक्या लवकर राजकारणात येईन. मी राजकारणाला नेहमी समाजकारण म्हणून पाहिले आहे.पक्षाच्या अध्यक्षांनी निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्याने मी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. लोकांची सेवा करण्यासाठी मला कोणत्याही पदावर राहण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या क्षमतेनुसार मदत करत आली आहे आणि करत राहणार आहे. मी आणि माननीय मुख्यमंत्री नामची सिंगिथांग मतदारसंघासाठी योग्य उमेदवार देऊ, जो लोकांची सेवा करेल,” असा विश्वास त्यांनी आपल्या पत्रातून दिला. यावेळी त्यांनी पती तमांग यांचे कौतुक देखील केले. “मला विश्वास आहे की, तमांग यांच्या नेतृत्त्वात सिक्किम प्रगती आणि विकास साध्य करेल,”
दरम्यान, पत्नीच्या या निर्णयानंतर तमांग यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “कृष्णा कुमारी यांनी पक्षाचे कल्याण आणि उद्देश यांची प्राथमिकता लक्षात घेऊन सर्वानुमते आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघासाठी एका समर्पित उमेदवाराची निवड केली जाईल.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top