पदके अर्पण न करताच कुस्तीपटू माघारी परतले

नवी दिल्ली- भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी गंगेत पदके विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. हरिद्वार येथे शेतकरी नेत्यांनी कुस्तीपटूंची समजूत काढल्यानंतर गंगा तीरावरून कुस्तीपटू मागे परतले आहेत. कुस्तीपटूंनी शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्याकडे आपली सर्व पदके सोपवली आहेत. टिकैत यांनी कुस्तीपटूंना 5 दिवस थांबण्याची विनंती केली आहे.
जंतरमंतरवरून नव्या संसदेसमोरील महापंचायतीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुस्तीपटूंची रविवारी दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक व संगीता फोगाट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची सुटका करण्यात आली. परंतु कुस्तीपटूंवर गुन्हे दाखल करण्यात आले. तरीही आपला लढा चालू ठेवणार असल्याचे आज कुस्तीपटूंनी जाहीर केले होते. साक्षी मलिकने ट्विटरवर म्हटले होते की, 28 मे रोजी दिल्ली पोलीस आमच्याशी कसे वागले, किती निर्दयीपणे आम्हाला अटक करण्यात आली, हे तुम्ही सर्वांनी पाहिले. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी धुडगूस घालून आमचे आंदोलन उधळून लावले आणि दुसऱ्याच दिवशी आमच्यावर गंभीर गुन्ह्यांमध्ये एफआयआर दाखल केला. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाबाबत न्याय मागून गुन्हा केला आहे का? पोलीस आणि यंत्रणा आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक का देत आहेत?
आता आम्हाला आमची पदके नको आहेत. राष्ट्रपती व पंतप्रधानांनी आमची काळजी केली नाही. त्यामुळे आम्ही ही पदके त्यांना परत करणार नाही तर गंगेत बहाल करणार आहोत.
मंगळवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास कुस्तीपटू पदकांनी भरलेल्या बॅगा घेऊन हरिद्वार येथे पोहोचले. त्यानंतर बराच वेळ ते आपली पदके कवटाळून बसले होते. गंगेत पदके विसर्जित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयाला श्री गंगा सभेने विरोध केला होता. दीड तासांच्या नाट्यानंतर शेतकरी नेत्यांनी कुस्तीपटूंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याला यश येऊन कुस्तीपटूंनी आपला निर्णय बदलला आणि ते माघारी फिरले.
दरम्यान, लैंगिक शोषणाचे आरोपी भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांनी अयोध्येत महारॅलीचे आयोजन केले आहे. ही मेगा रॅली 5 जून रोजी होणार आहे. त्यात प्रामुख्याने अनेक संत सहभागी होतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top