परराज्यातील ढोलकी विक्रेते यंदाही पेणमध्ये दाखल

पेण

रायगडासह कोकणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून येणारे ढोलकी विक्रते आता जिल्ह्यातील गावागावात, शहरात ढोलकी बनवताना व विकताना दिसत आहेत.
सध्या पेण शहराच्या वेशीवर असलेल्या गोवा महामार्गाच्या पुलाखाली त्यांची कुटुंबे झोपडी बांधून राहत आहेत. ‘शासनाकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नसल्याने उघड्यावर बसून हा व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे,’ अशी मागणी विक्रेते उस्मान शेख यांनी केली आहे.

कुटुंबाचा चरितार्थ भागवण्यासाठी परराज्यातून आलेली ही कुटुंबे रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहतात. ढोलकी विकण्याचा फिरतीचा व्यवसाय करताना कुटुंब प्रमुखांना आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावत असते. शिसव, फणस, आंबा या झाडाच्या लाकडापासून ढोलकी बनवली जाते. लाकडाच्या साच्याला रंगरूप देऊन ढोलकी बनविल्यानंतर त्या गावागावात, शहरात जाऊन विकल्या आहेत. या ढोलकी आकारानुसार साडेतीनशे ते पंधराशे रुपयांनुसार विकली जाते. ग्राहक घासाघीस करून किंमत कमी करतात. हा व्यवसाय फिरतीचा असला तरी दरवर्षी आम्ही रायगड जिल्ह्यात गणपती उत्सवाच्या आधी यावे लागते. आमच्या तीन पिढ्या ह्या ढोलकी व्यवसायात गेल्या आहेत. मात्र, अद्यापही आमचा राहण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आम्ही शिकू शकलो नाही. मात्र, आमच्या मुलांनी शिकून नोकरी करावी, अशी इच्छा शेख यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ढोलकी बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत मागील वर्षांच्या तुलनेत २० टक्क्यांची वाढ झाल्याने ढोलकीच्या किमतीतही २० टक्क्यांची वाढ करावी लागल्याचे शेख यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top