चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते. मात्र पाऊस थांबल्यानंतर या घाटाच्या कामासंदर्भात विशेष लक्ष देण्यात आले. घाटातील रुंदीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. रुंदीकरणाचे काम दिवस रात्र काम सुरु ठेवण्यात आले. घाटाच्या मध्यापर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता अतिशय धोकादायक असलेला दरडीच्या डेंजर झोनमध्ये संरक्षण भिंतीचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी बहुतांशी काम मार्गी लावण्याची शक्यता आहे. चौपदरीकरण पूर्ण झाल्याने मुंबईतील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखरुप होईल.
परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सुरु असताना अर्धवट केलेल्या डोंगर कटाईमुळे पावसाळ्यात या डोंगराची माती, दरड महामार्गावर येऊन वाहतूक ठप्प होते. गेल्या पावसाळ्यात तर आठ वेळा दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. कामासाठी घाट दोन महिने बंद करण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर या घाटाच्या कामासंदर्भात विशेष लक्ष देण्यात आले आहे. सबंधित प्रशासन आणि चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या तत्परतेने घाटाच्या कामाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे बहुतांश काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.