नागपूर – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालावर शरद पवारांनी भाष्य करत नैतिकतेच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक टीका करत असा प्रश्न उपस्थित केला की, शरद पवारांचा नैतिकतेशी काही संबंध आहे का? आता जर शरद पवारांनी भाजपाला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच होईल. इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे गेले इथून सुरुवात होईल. त्यामुळे जाऊ द्या. ज्येष्ठ नेते आहेत. बोलत असतात. इतक लक्ष द्यायचे नसते”, असे फडणवीसांनी म्हटले होते.
यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले की, नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकारच नाही. जे मोदींचे फोटो लावून निवडून आले. आल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचारही सोडला, युती सोडली, पक्षही सोडला ते कोणत्या तोंडाने नैतिकता सांगतात ते मला समजतच नाही. निकाल त्यांच्या बाजूने आला असे ते म्हणत असतील तर त्यांनी ढोल बडवावेत.
विधानसभा अध्यक्षांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली. यावर फडणवीसांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातले सगळे अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे अध्क्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर ते मुक्त आणि न्याय्य न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की, अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडतील. विधानसभा अध्यक्ष स्वत: निष्णात वकील आहेत. त्यामुळे ते कायद्यानुसार योग्य सुनावणी करून योग्य निर्णय घेतील.