कराची – पाकिस्तान-अफगाण सीमेजवळील पारचिनार येथील टेरी मंगल हायस्कूलमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात सात शिक्षकांचा मृत्यू झाला. सशस्त्र लोकांनी स्टाफ रूममध्ये गोळीबार केला. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. मृत्युमुखी पडलेल्या सात शिक्षकांपैकी चार शिया समुदायाचे असल्याचे सांगण्यात येते.
सुन्नी दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणल्याचेही बोलले जात आहे. या शाळेच्या स्टाफ रूममध्ये शिक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा संच तयार करत होते.त्यावेळी कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी शाळेबाहेर लावलेले बॅरीकेड तोडून थेट स्टाफ रूम गाठली. लगेच स्टाफ रूममध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि त्यानंतर त्याच गाडीतून आरामात निघून गेले. दरम्यान, तिथून जवळच असलेल्या आणखी दोन शिक्षकांनाही गोळ्या झाडून ठार मारल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. ज्ञानाच्या शत्रूंनी शिक्षकांवर केलेला हा हल्ला निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही या शिक्षकांच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.