गिलगिट-बाल्टिस्तान :
पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान भागात शनिवारी (२७ मे) झालेल्या हिमस्खलनाच्या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानच्या अस्टोर जिल्ह्यातील शांटर टॉप भागात हिमस्खलनात प्राण गमावलेल्या ११ मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. पाकिस्तानी लष्करी जवानांसह स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्विट करत हिमस्खलनात जीव गमावल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “हवामान बदलाच्या परिणामांमुळे पाकिस्तानमध्ये अशा घटना वाढत आहेत. पाकिस्तानसारख्या विकसनशील देशांना या घातक परिणामांपासून वाचवण्याची जबाबदारी संपूर्ण जगाने पार पाडली पाहिजे.” दरम्यान, २०२२ मध्येही पाकिस्तानात विनाशकारी पूर आला होता. त्या पुरात २ हजार लोकांचा मृत्यू झाला होता आणि ८० लाख पाकिस्तानी बेघर झाले होते. सिंध आणि बलुचिस्तान प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता.