मुंबई – पाकिस्तानचे प्रसिद्ध गिर्यारोहक साजिद सदपारा यांनी कृत्रिम ऑक्सिजन आणि शेर्पांच्या मदतीशिवाय जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे. ही कामगिरी करून त्यांनी पाकिस्तानी गिर्यारोहणाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. रविवारी सकाळी 8.20 वाजण्याच्या सुमारास साजिद हे जगातील 8849 मीटर उंचीच्या या एव्हरेस्ट शिखरावर पोहचले.
साजिद सदपारा यांच्या माऊंट एव्हरेस्टच्या चढाईला वैयक्तिक यशापलीकडे खूप महत्त्व आहे.त्यांचे दिवंगत वडील मोहम्मद अली सदपारा हे एक महान पाकिस्तानी गिर्यारोहक होते आणि असा एकट्याने विक्रम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. आपल्या पित्याचे हे स्वप्न साजिद यांनी पूर्ण केले आहे. त्यांच्या वडिलांनीसुद्धा मनासलू आणि अन्नपूर्णा सर करून पहिला पाकिस्तानी गिर्यारोहक बनण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी ऐन हिवाळ्यात के-टू हे शिखर दोनदा सर केले होते. साजिद सदपारा यांच्याप्रमाणे त्याचदिवशी आणखी एका पाकिस्तानी महिला गिर्यारोहकाने एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे. दुबईमध्ये राहणार्या बँकर नैला कियानी यांनी एव्हरेस्टसह 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची पाच शिखरे सर करण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणार्या त्या दुसर्या पाकिस्तानी महिला गिर्यारोहक आहेत. कियानी हिच्यासोबत मूळ पाकिस्तानी वंशाची ब्रिटिश गिर्यारोहक नादीया आझाद याही या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आणि गिर्यारोहकांनी सदपारा आणि कियानी या दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये कियानी यांचे कौतुक करताना म्हटले आहे की, पाकिस्तानी महिला कोणतेही आव्हान पूर्ण करण्यास सक्षम असतात हे कियानी यांनी जगाला दाखवून दिले आहे.
पाकिस्तानी साजिद सदपारा यांचा पराक्रम ऑक्सिजन, शेर्पाशिवाय एव्हरेस्ट सर केला!
