कराची- सध्या आर्थिक संकटात सापडलेला भारताचा शेजारी देश पाकिस्तान आता पाणीटंचाईत होरपळण्याची शक्यता आहे.शाहपूर कंदी धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रावी नदीच्या पाण्याचा पाकिस्तानकडे जाणारा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे.त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानात भीषण पाणीटंचाई उद्भवू शकते,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शाहपूर कंदी बॅरेज पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवर आहे.यापूर्वी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या ११५० क्युसेक पाण्याचा आता जम्मू-काश्मीर क्षेत्राला फायदा होणार आहे.कठुआ आणि सांबा जिल्ह्यांतील ३२ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीला याचा फायदा होईल. त्यानंतर हे पाणी सिंचनासाठी वापरले जाईल.सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शाहपूर कंदी बॅरेज प्रकल्पाला गेले तीन दशके अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे.आता २९ वर्षांनंतर शाहपूर कंदी बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू जल करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्याअंतर्गत रावी,सतलज आणि बियास नद्यांच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे,तर सिंधू, झेलम आणि चेनाब पाकिस्तानच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे.शाहपूर कंदी बॅरेज बांधल्यानंतर रावी नदीचे पाणी राखून ठेवण्याचा अधिकार भारताला आहे. पूर्वी हे पाणी लखनपूर धरणातून पाकिस्तानकडे जात असे,मात्र आता या पाण्याचा फायदा पंजाब आणि जम्मू-काश्मीरला मिळणार आहे.दरम्यान, शाहपूर कंडी बॅरेज प्रकल्पाची पायाभरणी १९९५ मध्ये माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी केली होती.