इस्लामाबाद
पाकिस्तानातील कराची येथे राहणारी एरिका रॉबिन ही पाकिस्तानची पहिली मिस युनिव्हर्स बनली आहे. मात्र, ही स्पर्धा जिंकल्यावर ती वादात सापडली आहे. युनायटेड अरब अमिरातीत झालेल्या भव्य स्पर्धेत प्रथमच मुस्लीम देश पाकिस्तानची एरिका रॉबिन मिस युनिव्हर्स म्हणून निवडून आली आहे. परंतू युएईत पाकिस्तानच्या नावाने ब्युटी कॉन्टेस्ट करणाऱ्या कंपनीवर पाकिस्तान सरकार संतापले आहे.
पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवार-उल-हक काकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाला युएई सरकारशी संपर्क करायला सांगितले आहे. या स्पर्धेत मिस युनिव्हर्स स्पर्धेत पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी उमेदवारांची निवड झाली होती. परंतु आता पाकिस्तान सरकारने या कार्यक्रमाच्या हेतूवर शंका उपस्थित करीत चौकशीचे आदेश दिले आहेत.
युएईत पाकिस्तानाच्या नावाचा वापर करुन सौदर्य स्पर्धा भरविणाऱ्या कंपनीवर सरकार भडकले आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारची परवानगी घेतलेली नाही असे सरकारचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवार-उल-हक काकर यांनी गुप्तचर विभागाला या संघटनेची पाळेमुळे शोधण्याचे आदेश दिले आहेत. ही कंपनी जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या नावाचा गैरवापर तर करीत नाही ना , याचा संशय पाकिस्तानला आला आहे.