पारपोलीतील टाॅवर वस्ती पासून दूर असावा! ग्रामस्थांची मागणी

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गमधील पारपोली गावात बीएसएनएल टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा टॉवर ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या जागेत उभारण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. पारपोली गावात बीएसएनएलच्या नियोजित टॉवरला आमचा विरोध नाही, मात्र नियोजित टॉवर पारपोलीतील वस्तीपासून दूर असावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पारपोली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे.
अनेक वर्षांच्या मागणीनंतर पारपोली गावात बीएसएनएल टॉवर उभारण्याचा ठराव मंजूर झाला आहे. मात्र या टॉवरसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेला ग्रामस्थांचा विरोध होत आहे. ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या जागेत टॉवर उभारल्यास त्याचा फटका वस्तीतील रहिवासी, शेतकरी आणि बागायतदारांना बसणार. त्यामुळे हा टॉवर गावाच्या सिमेलगत ओवळीये पुलाजवळ सर्वे नंबर १२/५ मधील ०.१४ गुंठे या जागेत साकारावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने जुना ठराव रद्द करून या ठिकाणी टॉवर बांधण्याचा ठराव करावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नियोजित टॉवरची सध्याची जागा न बदलल्यास याबाबत लवकरच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे टॉवरची जागा बदलण्याची मागणी केली जाईल, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top