मीरा रोड –
मीरा-भाईंदर महापालिकेच्या मीरा रोड येथील महापालिका रुग्णालयाची लिफ्ट गेले पाच दिवस बंद असल्यामुळे गर्भवती महिला, वृद्ध रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना उचलून पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत न्यावे व आणावे लागत आहे.
मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर भागात भारतरत्न दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी रुग्णालय आहे. या रुग्णालयात केवळ एकच लिफ्ट आहे. या लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका खाजगी ठेकेदारास दिलेला आहे. मात्र गेल्या शनिवारपासून लिफ्ट बिघडल्याने बंद आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चालत जाणे – खाली उतरणे गर्भवती महिला, डायलिसिसच्या रुग्णांसाठी कठीण झाले आहे. जिने चढणे अजिबात शक्य होत नाही, त्या रुग्णांना रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांचे नातलग खुर्चीवर बसवून किंवा स्ट्रेचरने, चादरीत ठेवून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर नेतात. या प्रकारे गर्भवती महिला व रुग्णांना ने-आण करताना अपघाताची शक्यता असते.
दरम्यान, लिफ्टची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारास आवश्यक निधी उपलब्ध करून न दिल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचा संताप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी व्यक्त केला आहे.