मुंबई – ऐन सणासुदीमध्ये मुंबई महापालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशव्या बंदी मोहीम तीव्र केली आहे.प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर तर भरमसाठ आर्थिक दंड लादण्याचा निर्णय घेतला आहे.आता अशा प्लास्टिक पिशव्यांचा साठा किंवा विक्री करणाऱ्याचा तिसरा गुन्हा असेल तर त्याच्याकडून थेट २५ हजार दंड वसूल केला जाणार आहे.तसेच यात ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.
पालिकेचे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने प्लास्टिक पिशव्या बंदी मोहीम उघडली आहे. २१ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत विविध ठिकाणे छापे मारून १६४३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.या कारवाईत ३७ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे दोघांना न्यायालयातही उभे केले. सांताक्रूझ येथे १४ सप्टेंबर रोजी टाकलेल्या छाप्यात एकाच दिवशी १८३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.या कारवाई पथकात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे २४ अधिकारी सहभागी झाले आहेत. ही मोहीम राबविताना महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम ९ अन्वये पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये,दुसर्या गुन्ह्यासाठी १० हजार रूपये आणि तिसर्या गुन्ह्यासाठी थेट २५ हजार रुपये दंड व ३ महिने तुरुंगवास अशी कारवाई होणार आहे.