पालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता गणित,विज्ञानाचे विशेष धडे

मुंबई – मुंबईतील पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिका शाळेतील १० वीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाचे विशेष धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी अ‍ॅनिमेशन गेमिफाईड ई कंटेट या अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे.तब्बल १८ हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे,अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागातून देण्यात आली.

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या टॅबमध्ये अ‍ॅनिमेशन गेमिफाईड ई कंटेट हे अ‍ॅप डाऊनलोड केले जाणार आहे.या अ‍ॅपमध्ये गणित आणि विज्ञानाचे गेम असणार आहेत.याच माध्यमातून विद्यार्थ्यांना या दोन्ही विषयांचे विशेष धडे देण्यात येणार आहेत. पालिकेच्या १८ हजार विद्यार्थ्यांसाठी हे अ‍ॅप खरेदी केले जाणार आहे.मुंबई महापालिकेच्या ११५० शाळांमध्ये आठ भाषांमधून शिक्षण दिले जाते.त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराथी, तामिळ, तेलुगू, कन्नड आदी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. महापालिकेच्या पूर्व प्राथमिक,प्राथमिक, माध्यमिक शाळांची संख्या १,१४६ असून सुमारे तीन लाख १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.तसेच खासगी प्राथमिक अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांची संख्या १,०९८ असून या शाळांमध्ये तीन लाख ७४ हजार १९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांबाबत अधिक आवड निर्माण व्हावी यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने ही अभिनव मोहीम हाती घेतली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top