मुंबई – मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू असून आजही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे ठिकठिकाणी नद्यांची पाणीपातळी वाढली, धरणे ओसंडून वाहू लागली, रस्ते-पूल वाहून गेले, शेतात पाणी शिरले, आणि जनजीवन विस्कळीत झाले. हवामान खात्याने गुरुवारसाठी मुंबई, रत्नागिरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून या जिल्ह्यातील शाळा कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर ठाणे, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात कसर भरून काढली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आजही मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी, विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह इतर काही भागात 28 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून गुरुवारी दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे मुंबई, रत्नागिरी व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. तर मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही मुंबईकरांना सतर्क राहण्यास तसेच गरज असल्याशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईसह रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नागपूर या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आज विधानभवनात विशेष बैठक घेतली.
मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत शहरात 86 तर उपनगरात 44 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. अंधेरी येथील सब-वेमध्ये पाणी जमा झाले. मंगळवारी पावसामुळे अंधेरी येथे महाकाली मार्गावर दरड कोसळून मातीचा ढिगारा थेट इमारतीत आला होता. या घटनेत जीवितहानी झाली नाही. जुलै महिन्यात मुंबईत आतापर्यंत 1,348 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून उद्या त्याची तीव्रता अधिक वाढणार आहे. गेल्या तीन वर्षांतला जुलैमधील झालेला सर्वाधिक पाऊस आहे. 2020 मध्ये जुलै महिन्यात 1,502 मिलीमीटर पाऊस झाला होता. जुलै महिन्याचे अजूनही 5 दिवस शिल्लक असल्याने हा रेकॉर्ड मोडला जाईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सात तलावांपैकी एक असलेला तानसा तलाव सकाळी 4.35 मिनिटांनी भरून वाहू लागला. तर बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातील विहार तलावही सकाळी भरला. काही दिवसांपूर्वी तुळशी तलावही भरला होता. सतत पडणार्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सात तलावांची पाणीपातळी आज 55 टक्क्यांवर गेली असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, मुंबईतील 10 टक्के पाणीकपात आणखी काही दिवस चालू राहाणार असल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईजवळच्या भिवंडी येथे शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याने भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या आयुक्तांनी शहरातील शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. कल्याण-डोंबिवलीत नेतवली डोंगराजवळ दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
रायगड जिल्ह्यात रेड अलर्टमुळे बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 150 दरडप्रवण गावांतील 571 कुटुंबांमधील 1701 लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पुरामुळे धोका होऊ शकतो, अशा 24 गावांतील 130 कुटुंबांतील 477 लोकांना हलवण्यात आले आहे. एकूण 701 कुटुंबांतील 2078 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. इर्शाळवाडी घटनेनंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. समाजमंदिर, शाळेत करण्यात आलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे दोन लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पुरवठा विभागाकडून त्यांना धान्य देण्याची व्यवस्था करावी, तसेच आवश्यक तेथे शिवभोजन थाळीचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान चिपळूण तालुक्यात दरडीचा धोका असलेल्या 13 ग्रामपंचायत परिसरातील 36 वाड्यांमधील कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा पुन्हा एकदा बजावण्यात आल्या आहेत.
कोल्हापूरवर पुन्हा पुराचे संकट
राधानगरीचे चार दरवाजे उघडले
पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूरमध्येही पावसाचा कहर सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील सांगोली धरण भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे राधानगरी धरण 100 टक्के भरले. त्यामुळे धरणाचे तीन, चार, पाच आणि सहा नंबरचे स्वयंचलित दरवाजे आज उघडण्यात आले. धरणाच्या उघडलेल्या दरवाजातून भोगावती नदीपात्रामध्ये एकूण 7112 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती धोका पातळीच्या वर जात आहे. सध्या ती 42 फुटांवरून वाहत असून आणखी एक फूट पाणी वाढल्यास जिल्ह्यास महापुराचा धोका संभवणार आहे. कोल्हापूरला असलेल्या संभाव्य पुराच्या धोक्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेची सूचना दिली आहे. राधानगरी, कुंभी, तुळशी, कासारी धरणातून पाणी पंचगंगा नदीत येत असते. दरम्यान, राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. मात्र हे पाणी कोल्हापूर शहरापर्यंत यायला 15 तास लागतात. त्यामुळे पाऊस पडला नाही तर नदीची पाणी पातळी जास्तीत जास्त 44 फुटांपर्यंत जाऊ शकते. कोल्हापूर शहरामध्ये पाणी येते त्या ठिकाणावरील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. चिखली, आंबेवाडी, आरे गावातील नागरिकांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे. नागरिकांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्याची व्यवस्था केली. जनावरांचा चारा, त्यांना बांधण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, सूचनांचे पालन करावे. घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. अनेक गावात नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले. कोल्हापूर शहरातील जामदार क्लब आणि सुतारवाडा येथील नऊ कुटुंबांना चित्रदुर्गमठात हलवण्यात आले. ग्रामीण भागातील 20 कुटुंबांना आणि 30 जनावरांना हलवण्यात आले. कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडी मार्ग बंद झाल्याने या मार्गावरून कोकणात जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली. कोल्हापूर शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना पुढील आदेश येईपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणार्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या. 28 जुलैपासून परीक्षा पूर्ववत होणार आहेत.