पावसाळ्यापूर्वी मुंबईतील खड्डे बुजवण्याच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्या आहेत. सात विभागातील खड्डे भरण्यासाठी पालिका प्रत्येकी १५ कोटी रुपये खर्च करणार आहे.
दर पावसाळ्यापूर्वी मुंबईतले खड्डे हा चर्चेचा विषय असतो. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना २५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी पालिकेने रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची योजनाही हाती घेतली आहे. मुंबईतल्या ३९७ किमीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे ६,०८० कोटी कोटी रुपयांचे काम पालिकेने हाती घेतले आहे. हे आतापर्यंतचे पालिका क्षेत्रातले रस्त्यांचे सर्वात मोठे कंत्राट आहे. रस्त्यांची अनेक कामे सुरू आहेत आणि ती पावसाळ्यानंतर वेग धरतील, अशी अपेक्षा आहे.
रस्त्यावरील रासायनिक थर मुसळधार पावसात धुवून निघतात, त्यामुळे आम्ही सध्याच्या खड्डे भरण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेने त्वरित कडक होणारे काँक्रीट आणि रिअॅक्टिव्ह अॅसफाल्ट टेक्नॉलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी कुलाबा ते भायखळा, परेल ते धारावी, कुर्ला ते मुलुंड आणि वांद्रे ते दहिसरमधील खड्डे भरण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या. पुढील ४५ दिवसात कंत्राटदाराला हे काम पूर्ण करावयाचे आहे.
५० कोटींचा भुर्दंड?
पालिकेने नोव्हेंबर २०२२ मध्ये एमएमआरडीएकडून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग हस्तांतरित करून घेतला. त्यानंतर दोन्ही हायवेंसाठी २७४ कोटी रुपयांच्या देखभाल खर्चाची वर्क ऑर्डर निघाली. मात्र यापैकी जीएसटीपोटी ५० कोटी रुपये द्यावे लागतील हे निविदेत म्हटले नव्हते असा दावा करत कंत्राटदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाच्या निर्देशांनुसार पालिका यासंबंधी कायदेशीर सल्ला घेणार आहे.