मुंबई- मुंबईसह महाराष्ट्रातील ६ एनटीसी गिरण्या कोविड लॉकगाऊनचे निमित्तसाधून सन २०२० पासून केंद्र सरकारने बंद केल्या आहेत.कामगारांनी अनेक आंदोलने केली.पण अद्याप त्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. या कामगारांना अर्धा पगार देण्यात येत होता.पण गेल्या सहा महिन्यांपासून तोही पगार देण्यात आलेला नाही.त्यामुळे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय उपासमारीने त्रस्त झाले असून त्यांच्या मध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.
मुंबई चौपाटी येथील इंडिया युनायडेड मिल क्रमांक ६ ची जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. त्याच्या एकूण जमिनीपैकी ५० हजार चौ.मी.जमिनीच्या टिडिआर पोटीची सुमारे १२ ० कोटी रुपयाची रक्कम नुकतीच राज्य सरकारने एनटीसीला अदा केली आहे.तेव्हा केंद्र सरकारने आधी कामगारांच्या थकीत पगाराचे पैसे त्वरित द्यावेत,अशी मागणी कामगारांनी केली आहे.या प्रश्नावर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर संतप्त कामगार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या वरळी येथील निवासस्थानी जाऊन आपला रोष व्यक्त करणार आहेत.या आंदोलनाचे नेतृत्व मनोहर देसाई आणि बबन आस्वले हे कामगार कार्यकर्ते करणार आहेत.