कराड – राज्यातील बाजार समितीचे निकाल लागले आहेत.या निकालात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.तर भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा रावादीचाच असेल असे विधान करून आघाडीतील नेत्यांची झोप उडवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल येताच जयंत पाटील यांनी काल रात्री कराडमध्ये मीडियाशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार आहे, हे आता सगळ्यांनी मान्य केले आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल.’ जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदावरच भाष्य केल्याने पाटील यांच्या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ अभेद्य असल्याचेही म्हटले आहे.
जयंत पाटील असेही म्हणाले की, राज्यातील बाजार समितीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा आघाडीच्या बाजूनेच कल दाखवला आहे.त्यामुळे आघाडीची वज्रमुठ अभेद्य भेग नसून ही वज्रमूठ मोठ्या क्षमतेची असल्याचे आज विरोधकांना कळले असेल, असा टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ९ महिन्यात राज्यात १२०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, तसेच बाजार समितीच्या निवडणुका किचकट करण्याचे काम देखील शिंदे सरकारकडून करण्यात आले. त्यामुळे सर्वांचा रोष म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सरकार विरोधात महाविकास आघाडीला कौल दिला आहे. त्याच्यबरोबर राज्यातील १४८ पैकी ७५ मोठ्या बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच! कराडमध्ये जयंत पाटलांचा दावा
