पुढील ४८ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज

पुणे – मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरातील वातावरण सातत्याने बदलत आहे. कुठे उन्हाचा तडाखा,तर कुठे अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे.काही भागात उष्णतेची लाटसुद्धा जाणवत आहे.अशातच आता राज्यातील काही भागांमध्ये पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

येत्या ३१ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.काल रविवारी हिंगोली, भंडारा,गोंदिया,नागपूरसह अन्य काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.गारा आणि विजांच्या कडकडाटासह विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासुन काहीसा दिलासा मिळाला आहे.राज्यातील काही शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे.आता नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत पाऊस अंदमान,निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे.

दरम्यान,राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top