पुणे- पुणेकरांचा विमान प्रवास महागला आहे. पुण्यातून दिल्ली,बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरादरम्यान नियमित उड्डाण करणाऱ्या विमानांच्या तिकिटादरांत २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.येत्या काही दिवसांत दसरा, दिवाळी सण असल्यामुळे विमानातून प्रवास करण्याची संख्या वाढली आहे.यामुळे विमान तिकिटाच्या दरात मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
पुण्यातून दिवसाला साधारण १८० ते १९० विमाने उड्डाण घेतात. त्यातून रोज ३० ते ३१ हजार प्रवासी प्रवास करतात.दिल्ली,बंगळुरू या शहरासाठी पुण्यातून सर्वाधिक विमाने सुटतात.एकीकडे विमान प्रवाशांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे प्रवाशांना पुरेशा विमान कंपन्या नाहीत.त्यामुळे वाढती प्रवासी संख्या आणि विमानांची संख्या कमी यामुळे सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना जास्त तिकीट दर मोजावा लागत आहे.पुणे -दिल्ली – आधीचे तिकीट ८,३५० तर आताचे तिकीट ११,०३५ रुपये इतके आहे. त्याचप्रमाणे पुणे- बंगळुरू प्रवसाचे आधीचे तिकीट ३,७०० तर आताचे तिकीट ५१०० रुपये, पुणे -हैदराबाद प्रवासाचे आधीचे तिकीट ५,५०० तर आताचे तिकीट ८,१०० रुपये आणि पुणे – चेन्नई प्रवासाचे आधीचे तिकीट – ४,८०० तर आताचे तिकीट ७,९०० रुपये असे आहे.