पुणे : पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रोसाठी विविध पदांवर आवश्यक कुशल मनुष्यबळ घेण्यासाठी बिहारमधील काही वृत्तांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप मनसेने केला आहे. महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना डावलून बिहारच्या लोकांना रोजगार दिला जातो. त्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. पीएमआरडीएचे औंध येथील कार्यालयासमोर पुणे शहर मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
मनसे नेते राजेंद्र वागसकर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस किशोर शिंदे, बाळा शेडगे, रणजीत शिरोळे, हेमंत संभूस यांनी पीएमआरडीला निवेदन दिले. यावेळी कामगार सेनेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी विद्यार्थी सेना राज्य संघटनक प्रशांत कनोजिया, विभाग अध्यक्ष विनायक कोतकर व महाराष्ट्र मनसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पुण्यात मेट्रो प्रक्लप राबवताना राज्यातील भुमीपुत्रांना रोजगार देणार असल्याचे राज्य सरकार व मेट्रो प्रशासनाने सांगितले होते. परंतु आता प्रत्यक्षात जाहिरात मात्र बिहारमध्ये प्रसिद्ध केल्याबद्दल मनसेने संताप व्यक्त केला जात आहे. पुणे मेट्रो भरतीमध्ये महाराष्ट्रातील भूमीपुत्रांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या. मराठी वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत जाहिराती प्रसिद्ध करा. तसे न केल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेने दिला आहे.
पुणे मेट्रोच्या भरतीसाठी बिहारला जाहिराती! मनसेचे तीव्र आंदोलन
