पुणे – पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसराला आज पुन्हा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाने चांगलेच झोडपले. पुणे शहरातील सिंहगड रस्त्याला मुसळधार पाऊस, तर कोथरूड परिसरात गारांसह जोरदार पाऊस कोसळल्याने पुणेकरांची धावपळ उडाली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पुण्यातील तापमान वाढले होते. दिवसा प्रचंड उष्मा जाणवत होती. मंगळवारपासून पुणे शहरातील कमाल तापमानाचा आकडाही चाळीशीमध्ये पोहोचला होता. मात्र, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाने पुण्यातील कोथरूड, आंबेगाव पठार, कर्वे नगर, वारजेसह शहराच्या इतर भागांत हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊसदेखील झाला.