पुणे- पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसचा काल भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती, तेव्हा इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किमी अंतरावर बसची दोन्ही टायर फुटून हा अपघात झाला. टायर फुटल्यामुळे बसचे नियंत्रण सुटले आणि बस लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला जाऊन धडकली, यानंतर बस पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडून २५-३० फूट खाली जाऊन आदळली. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस आणि एनएचएआयचे पथक घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य सुरु केले. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची माहिती अजून मिळालेली नाही. पण बसमधील १०-११ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर इंदापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी बसचे मोठ्या नुकसान झाले आहे.