पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १४ सप्टेंबरपासून चिंतन बैठक

पुणे : पाच राज्यांमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांवर मंथन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यात १४ सप्टेंबरपासून तीन दिवसांची चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहून राजकीय रणनीतीविषयी चर्चा करणार आहेत. या बैठकीच्या एक दिवसानंतर लगेच १८ तारखेला संसदेकडून विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे.
पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे ही तीन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीला संघामधील सुमारे ३५ ते ४० संघटनांचे २५० हुन अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. परंतु,अमित शहा आणि जे.पी.नड्डा हे दोघेही या बैठकीला पूर्ण वेळ उपस्थित राहणार असल्याने या बैठकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला भाजपसहित विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्या भारती, भारतीय किसान संघ, संस्कार भारती, सेवा भारती तसेच संस्कृत भारती अशा २६ संलग्न संस्थांचे वरिष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आरएसएसचे उच्च पदस्थ पदाधिकारी तसेच संलग्न संस्थांचे वरिष्ठ पदाधिकारी हे सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक मूल्ये, समाजसेवा, अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर विचारमंथन करतील, तसेच या बैठकीत राजकीय परिस्थितीवरही महत्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. अमित शहा आणि नड्डा हे दोघेही आगामी निवडणुकांसाठी भाजपने काय रणनीती आखली आहे, याबाबत संबंधित मार्गदर्शन करतील. सरसंघचालक मोहन भागवत तसेच संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे शहा आणि नड्डा यांच्याशी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करतील. तसेच राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील आगामी निवडणुकांविषयी आपले मत प्रदर्शित करतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top