मॉस्को- रशियाचे हुकूमशहा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे पत्रकारापासून राजकीय नेत्यांपर्यंत आपल्या प्रत्येक विरोधकाला थेट यमसदनी धाडतात. अशीच धक्कादायक घटना पुन्हा घडली आहे. युक्रेनशी युध्दात रशियाच्या बाजूने उभे राहिलेले शेजारी बेलारूस राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को हे अलिकडे युक्रेनशी युध्द संपवण्याची मागणी करू लागले होते. यामुळे दोन्ही नेत्यांतील संबंध ताणलेले असतानाच पुतिन यांची बंद दाराआड भेट घेऊन बाहेर पडलेले लुकाशेन्को काही मिनिटातच गंभीर आजारी होऊन विषबाधेमुळे मृत्यूच्या दारात पोहोचले आहेत. या घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे.
बेलारूस राष्ट्र रशियाला सतत मदत करीत आले आहे. मात्र युक्रेन युध्दात हे राष्ट्र आपले गुलाम राष्ट्र असल्याप्रमाणे पुतिन वागत होते. याला विरोध होत होता. युक्रेनचे युध्द थांबवावे, अशी मागणी बेलारूसने केली असतानाच बेलारूसमध्ये आण्विक अस्त्र ठेवून युक्रेन विरोधात त्याचा वापर करण्याचा पुतिनचा इरादा होता. मात्र, याला बेलारूसने कडाडून विरोध केला. परिणामी तणाव निर्माण झाला. हे बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटायला आले. त्यांच्यात बैठक झाली. मात्र त्यानंतर लुकाशेन्को यांची तब्येत इतकी बिघडली की, त्यांना थेट मॉस्कोतील रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांची प्रकृती इतकी नाजूक आहे की, त्यांना बेलारूसला हलवणेही शक्य नाही. त्यांना विषबाधा झाल्याचे सांगतात. मात्र विषबाधा झाली की विषप्रयोग केला अशी चर्चा आहे. यापूर्वीही पुतिन विरोधकांचे संशयास्पदरित्या मृत्यू झाले आहेत. पण आता एका राष्ट्राध्यक्षांचाच जीव धोक्यात गेल्याने, हे प्रकरण अधिक गंभीर मानले जाते आहे.
बेलारूसचे विरोधी पक्षनेते व्हॅलेरी सेपकालो यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे की, पुतिन यांच्याशी त्यांनी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर लुकाशेन्को यांना थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीवरून असे कळले आहे की, क्रेमलिनमध्ये लुकाशेन्को यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे. लुकाशेन्कोंची तब्येत खालावल्यानंतर त्यांना तत्काळ मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिकल रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवताना गुप्तता बाळगण्यात आली. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरुन त्यांच्याबद्दल बातम्या पसरू नयेत आणि कोणालाही संशय येऊ नये.
गेल्या काही दिवसांपासून लुकाशेन्कोंच्या तब्येतीची चर्चा होत होती. या महिन्याच्या सुरुवातीला ते रशिया दौऱ्यावर होते. रशियाच्या विजयदिनाच्या परेडमध्येदेखील ते सहभागी झाले होते. मात्र, व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या जेवणाला उपस्थित न राहता ते लगेच
देशात परतले.
त्यावेळी अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की, लुकाशेन्को परतले, तेव्हा ते थकलेले होते. त्यांच्या एका हातावर पट्टी बांधलेली होती. त्यांना बोलण्यासही त्रास होत होता. त्यावेळी त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय होता. मात्र, त्यावेळी या अफवा असून, मी मरणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. लुकाशेन्को यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, ते एडेनो व्हायरसशी लढा देत आहेत. हा एक विषाणू असून, त्यामुळे माझा मृत्यू होईल, असा जर कोणी विचार करत असेल तर त्याला आता काळजी करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले होते.
पुतिन यांना विरोध करणाऱ्या दहाहून अधिक जणांचे यापूर्वी गूढ मृत्यू झाले आहेत. तर काही जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्यात काही राजकीय नेते व पत्रकारांचा समावेश आहे. 20 ऑगस्ट 2020 रोजी पुतिन विरोधक आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातील नेते अलेक्सी नवाल्नी विमानप्रवास करत असताना अचानक अत्यवस्थ झाले. अनेक दिवस ते कोमात होते. त्यांच्यावर नोव्हिचॉक या अत्यंत विषारी नर्व्ह एजंटचा प्रयोग करण्यात आल्याचे त्यांचे रक्त, मूत्र आणि त्यांच्याकडील बाटलीतील पाण्याच्या नमुन्यांवरून सिद्ध झाले होते. 27 डिसेंबर 2022 रोजी भारतात आलेल्या पॉवेल अँटोन या रशियन खासदाराचाही ओदिशातील हॉटेलमध्ये गूढरित्या मृत्यू झाला होता. पॉवेल अँटोन यांनी युक्रेनविरोधात युद्ध छेडल्याबद्दल पुतिन यांच्यावर टीका केली होती. गेल्या महिन्यात मॉस्को न्यायालयाने पुतिनविरोधक व्लादिमिर कारा-मुर्झा यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करून 25 वर्षांची सजा सुनावली आहे.
पुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले? बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले
