पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री

इटानगर
बहुमताच्या बळावर पेमा खांडू यांनी आज सकाळी सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर चाऊना मीन यांनी उपमुख्यमंत्रिपदाची आणि आमदार बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, बालो राजा, केंटो जिनी आणि ओझिंग तासिंग यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
इटानगर येथे काल झालेल्या बैठकीत खांडू यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपाचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग उपस्थित होते. या बैठकीनंतर पेमा खांडू यांनी राज्यपाल के. परनाईक यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज इटानगर येथील दोरजी खांडू कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. पेमा खांडू २०१६ पासून अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. नबाम तुकी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी प्रथमच पदभार स्वीकारला. खांडू पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते काँग्रेससोबत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ४६ जागा जिंकल्या आहेत. पेमा खांडू यांच्यासह पक्षाचे 10 उमेदवार बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे केवळ 50 जागांवर निवडणूक झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top