प्रतीक्षा बागडी पहिली
महिला महाराष्ट्र केसरी

सांगली- सांगलीची कुस्तीपटू प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कल्याणच्या वैष्णवी पाटीलला चितपट करत प्रतिक्षाने हा किताब आपल्या नावावर केला. या सामन्यानंतर प्रतिक्षाला चांदीची मानाची गदा सुपूर्द करून भव्य सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा काल संध्याकाळी मिरजेतील जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडली. या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून 450 महिला कुस्तीगीर सहभागी झाल्या होत्या. प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील यांच्यात या स्पर्धेची अंतिम लढत संध्याकाळी सुरू झाली. या दोघी मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र, मध्यंतरानंतर बागडीने पाटीलला चितपट करत 4 विरुध्द 10 गुणांनी महिला केसरी पदकावर मोहोर उमटवली. याआधी आज सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात प्रतीक्षा बागडीने कोल्हापूरच्या अमृता पुजारीचा 9 विरूध्द 2 गुणांनी पराभव करत अंतिम लढतीत प्रवेश केला होता. तर, दुसऱ्या कुस्तीमध्ये वैष्णवी पाटीलने वैष्णवी कुशाप्पाचा 11 विरूध्द 1 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.
दरम्यान, प्रतीक्षा ही वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे. वडील रामदास बागडी यांच्याकडून तिला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले. प्रतिक्षाची आजवरची कामगिरी बघितली तर तिने तब्बल 12 वेळा राज्य स्पर्धेत पदके मिळवली आहेत आणि 22 वेळा राष्ट्रीय पातळीवर सहभाग आहे.

Scroll to Top