मुंबई – उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने ८ मेपासून नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरांतील प्रवाशांच्या सुविधेसाठी वाशी-स्वारगेट (पुणे) शिवनेरी सेवा सुरू केली होती. मात्र प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे दोन दिवसांतच ही सेवा बंद करण्याची नामुष्की एसटी महामंडळावर आली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची संख्या वाढल्याने एसटी महामंडळाने वाशी-स्वारगेट मार्गावर दररोज डिझेलवर धावणारी वातानुकूलित शिवनेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.बवाहक नसलेल्या या शिवनेरी बसची पहिली फेरी वाशीहून सकाळी ६.१५ वाजता त्यानंतर सकाळी ७.१५, दुपारी २.१५ आणि शेवटची फेरी दुपारी ३.१५ अशी होती.तर स्वारगेटवरून वाशीला जाणारी शिवनेरी सकाळी १०.१५, सकाळी ११.४५, सायंकाळी ६.४५ आणि शेवटची फेरी सायंकाळी ७.४५ वाजता अशी होती. मात्र, प्रवाशांच्या आवश्यक वेळेत या शिवनेरी बस सोडल्या जात नसल्याने या सेवेला प्रतिसाद मिळाला नाही.
विभाग नियंत्रक मोनिका वानखडे यांनी सांगितले की, वाशी ते स्वारगेट ही सेवा बंद करण्यात आली असून या गाड्या पुणे आगाराकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. पुणे आगाराच्या माध्यमातून प्रवाशांसाठी या बसचे नियोजन करण्यात येईल.
प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे वाशी – स्वारगेट शिवनेरी सेवा बंद
