प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे खुले

पुरी
ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे आज मंगला आरतीवेळी भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, पुरीचे खासदार संबित पात्रा आणि बालासोरचे खासदार प्रताप चंद्र सारंगी उपस्थित होते. मंदिरांचे दरवाजे उघडल्यानंतर सर्वांनी मंदिराची प्रदक्षिणा केली. याआधी या मंदिराचा फक्त सिंह दरवाजा भाविकांसाठी खुला होता.
मोहन चरण माझी यांनी सांगितले की,आम्ही काल पहिल्या कॅबिनेट बैठकीत जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊन आज सकाळी साडेसहा वाजता सर्व दरवाजे उघडण्यात आले. मंदिराच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांचा निधीही जाहीर करण्यात आला आहे.”
दरम्यान, कोरोनाच्या काळात माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारने मंदिराचा अश्व दरवाजा (उत्तर दरवाजा), वाघ दरवाजा (पश्चिम दरवाजा) आणि हस्ती दरवाजा (दक्षिण दरवाजा) बंद करण्याचे आदेश दिले होते. फक्त सिंह दरवाजा उघडा होता, ज्यातून भाविक मंदिरात ये-जा करत असत. त्यामुळे मंदिरात मोठी गर्दी आणि लांबच लांब रांगा लागत. मंदिराचे सर्व दरवाजे उघडण्याची मागणी भाविक अनेक दिवसांपासून करत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top